तुमसर : तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल भोयर यांच्यावर एका महिला रोखपल कर्मचाऱ्याने विनयभंगाचे गंभीर आरोप केल्यानंतर, आता बाजार समितीच्या संचालक मंडळाने कठोर पाऊल उचलले आहे. शिस्तभंगाची कारवाई करत अनिल भोयर यांना ११ फेब्रुवारीपासून एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
नेमके प्रकरण काय?
बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने सचिव अनिल भोयर यांच्याविरोधात ६ फेब्रुवारी रोजी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भोयर यांनी विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, त्यानंतर न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बाजार समितीच्या संचालक मंडळाने अनिल भोयर यांना तातडीने 'कारणे दाखवा नोटीस' बजावली होती. भोयर यांनी या नोटिसीला उत्तर देत आपला खुलासा सादर केला. मात्र, त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे मानत आणि संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून संचालक मंडळाने अखेर निलंबनाचा बडगा उगारला. शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत अनिल भोयर यांना ११ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत किंवा किमान एक महिन्यासाठी सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बाजार समितीमधील अंतर्गत राजकारण आणि कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणाचा पोलीस तपास आणि विभागीय चौकशी कोणत्या दिशेला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संचालक मंडळांनी केलेली कारवाई ही एकेरी पद्धतीने असून काही मोजके संचालकांच्या दबावाखाली घटनेची सत्यता पूर्णपणे न तपासता तसेच माननीय न्यायालयाने दिलेली अटकपूर्वक जमीन याचा विचार न करता व कोणतेही दोष सिद्ध न होता जाणीवपूर्वकरित्या एकेरी सत्ता असलेल्या संचालक मंडळांनी जे निलंबन केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे तरी याविरुद्ध आता कायदेशीर लढाई लढणार आहोत.-अनिल भोयर, निलंबित सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर.



