मुंबई : “टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानावे,” या माझ्या विधानाचा विपर्यास करून काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आहे.
टिपू सुलतान संदर्भातील त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. “माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे त्यांनी नमूद केले.
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ तोडून विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष ने राज्यभर आंदोलन छेडले होते.
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याशी तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध लढताना शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, एवढाच आशय मी मांडला होता. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला.”
इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत आणि अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, समाजात तणाव निर्माण होऊ नये, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवस हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



