नाशिक : स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाचे पडसाद आता सत्ताधारी पक्षांतही उमटू लागले आहेत. अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषणासारख्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया देताना खरातच्या कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारच्या भोंदूगिरीला कोणतीही माफी नाही आणि या प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव समोर आल्यास पक्ष स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, खरातच्या अटकेनंतर त्याचे चाकणकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असून महिलांच्या संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या पदावर असताना अशा व्यक्तींशी संबंध येणे योग्य नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले असून पोलिसांकडून खरातच्या आर्थिक व्यवहारांची आणि कथित बेकायदेशीर संपत्तीची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या राजकीय व्यक्तींची माहितीही तपासली जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यानंतर चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पदावर कायम राहणार की त्यांना पद सोडावे लागणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



