अकोला : पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी गंभीर घटना अकोल्यात समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे ड्युटीवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने ‘शरीरसुखा’ची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एएसआय राजेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीचे आमिष दाखवून मोठी फसवणूक केल्याच्या प्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्यामुळे तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. याच काळात संबंधित अधिकाऱ्याने तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती महिलेने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. माहिती मिळताच वरिष्ठांनी तात्काळ ठाण्यात धाव घेत संबंधित अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली.
सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपांची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



