मुंबई :मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम येथे आयोजित कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानसह अनेक नामवंतांनी उपस्थिती लावली. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर खोचक शब्दांत निशाणा साधला.
“संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला,” असा टोला नितेश राणेंनी लगावला. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणण्याचीही हिंमत दाखवू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंनी रटाळ प्रवचनात पीएचडी केली असती, अशी उपरोधिक टिप्पणीही राणेंनी केली.
राज ठाकरे यांच्यावर बोलताना नितेश राणे अधिक आक्रमक झाले. “राज ठाकरेंना योग्य दिशा आणि संघाच्या बौद्धिक कार्यक्रमांचा लाभ मिळाला असता, तर रटाळ भाषणांऐवजी वैचारिक भूमिका घेतली असती. त्यामुळे इतके लोक पक्ष सोडून गेले नसते,” असा घणाघात त्यांनी केला. तसेच, “राज ठाकरे सकाळी लवकर उठून संघाच्या कार्यक्रमाला आले असते, तर पक्ष कसा चालवायचा याचं ज्ञान मिळालं असतं,” असा खोचक टोला लगावला.
मालेगावातील वक्तव्यांचा उल्लेख करत नितेश राणेंनी राज ठाकरे यांच्यावर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. “मुल्ला-मौलवींविषयी गप्प बसायचं, हिंदू आणि हिंदुत्वावर मात्र जोरात बोलायचं. पाकिस्तानातील अब्बांना खूष करण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “संघाच्या कार्यक्रमावर बोलण्याची हिंमत आहे, पण मौलवींवर बोलण्याची नाही. मुंब्र्यावर जाऊन बोलण्याची हिंमत दाखवावी,” असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांतील यशानंतर नितेश राणेंनी महायुतीची ताकद अधोरेखित केली. “आता एक नंबरवर राहण्याची आम्हाला सवय झाली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांत महायुतीचा ‘फेव्हिकॉलचा जोड’ मजबूत झाला आहे. कोकण हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे,” असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाला केवळ तीन जागांवर रोखल्याचा दावा करत, “जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या अपेक्षा आता कृतीतून पूर्ण करू,” असेही नितेश राणे म्हणाले. मुंबईत एमआयएमला ठाकरे सेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्याचा उल्लेख करत, “हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला जनतेने ठोकर मारली आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
नितेश राणेंच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान चढल्याचं चित्र दिसत असून, त्यांच्या टीकेची जोरदार चर्चा सुरू आहे.



