नागपूर : “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली घडलेल्या गंभीर सायबर फसवणुकीच्या प्रकरणात नागपूर सायबर पोलिसांनी वेगवान हालचाली करत फिर्यादी दाम्पत्याची तब्बल १३ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांच्या दक्षतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका वयोवृद्ध दाम्पत्याला अज्ञात व्यक्तींनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या नावावर बँक खाते उघडून त्याचा वापर कथित दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा खोटा आरोप करण्यात आला. तसेच त्या व्यवहारातून कमिशन घेतल्याचा बनाव करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची भीती निर्माण करण्यात आली. “डिजिटल अरेस्ट”चा धाक दाखवत आरोपींनी दाम्पत्याला सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून मानसिक दबावाखाली ठेवले.
यानंतर “शासकीय तपासासाठी रक्कम जमा केल्यास ती परत मिळेल” अशी खोटी खात्री देत आरोपींनी दाम्पत्याकडून १३ लाख रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३८/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची साखळी (ट्रेल) त्वरेने शोधून काढत न्यायालयीन प्रक्रियेनंतर फिर्यादीची १०० टक्के रक्कम परत मिळवून दिली.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी सध्या दिल्लीतील कारागृहात असून त्याला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, सहआयुक्त नविनचंद रेड्डी, अपर आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी आणि उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “डिजिटल अरेस्ट”, शासकीय चौकशी किंवा बँक खात्यांच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या कोणत्याही कॉल्सवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.



