मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीवेळी सभागृहात तीव्र राजकीय वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले. एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत वातावरण तापले असतानाच निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
मुंबईच्या महापौरपदी तब्बल ४० वर्षांनंतर भाजपचा उमेदवार विराजमान झाला आहे. रितू तावडे यांची महापौर म्हणून तर शिवसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दोन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने औपचारिक घोषणा करण्यात आली.
निवड प्रक्रियेदरम्यान महायुतीच्या सदस्यांनी जल्लोष व्यक्त केला, तर विरोधी बाकांवरून ‘५० खोके’सह विविध राजकीय घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला. सत्ताधारी सदस्यांनीही प्रत्युत्तर देत सभागृहात घोषणांचा आवाज घुमवला. काही काळ कामकाजात व्यत्यय आल्याचे चित्र होते.
पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप-
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुरुवातीलाच पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला. सात वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना जबाबदारी न देणे योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्याला पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. मात्र आयुक्त भूषण गगराणी यांनी नियमांनुसारच निर्णय झाल्याचे सांगत आक्षेप फेटाळून लावला.
घोषणांनी सभागृहात तापलेले वातावरण-
सत्ताधाऱ्यांकडून “महायुतीचा विजय असो”, “जय श्रीराम” अशा घोषणा देण्यात येत होत्या, तर विरोधकांकडून “उद्धव ठाकरे यांचा विजय असो”, “शिवसेनेचा विजय असो” अशा घोषणा दिल्या जात होत्या. दोन्ही बाजूंच्या घोषणांमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्र्यांची भूमिका-
निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईत महायुतीची सत्ता स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला. “मुंबईकरांनी दिलेल्या कौलाचा सन्मान राखत पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेतील या सत्ताबदलानंतर पुढील काळात प्रशासनाची दिशा आणि प्राधान्यक्रम काय असतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे.



