सोलापूर: जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या आडून सुरू असलेल्या भोंदुगिरीचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. स्वतःला ‘बाळू मामाचा अवतार’ म्हणवून घेणारा मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. विशेष म्हणजे, तो याआधीच्या गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर असतानाही फसवणुकीचे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. भोसले याच्यावर यापूर्वी करमाळा, सोलापूर तालुका, बारामती आणि दौंड येथे महिलांवरील अत्याचार व आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
तपासात असेही समोर आले आहे की, ‘कॅन्सरसारखे आजार बरे करतो’ असे सांगून भोसले नागरिकांची फसवणूक करत होता. एका प्रकरणात त्याने व्यवसायात यश मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील ५० हजार रुपये घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीनुसार पोलिसांनी भोसले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. तपासाच्या धागेदोऱ्यांवरून कुर्डूवाडी पोलिसांनी पुण्यात कारवाई करत भोसलेला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणामुळे भोंदूबाबांच्या वाढत्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



