मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. बहुतांश महापालिकांमध्ये महायुती आणि विशेषतः भाजपने आपला प्रभाव कायम राखल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, तर काही महापालिकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाली आहे. मात्र भिवंडी आणि परभणीसारख्या ठिकाणी अद्याप सत्ता स्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे.
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली असून उपमहापौरपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणी महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नांदेड, अकोला, जालना, धुळे, सोलापूर, इचलकरंजी, पनवेल आणि नवी मुंबई येथे भाजपने थेट सत्ता मिळवली आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी (BVA) तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाची आघाडी सत्तेत आली आहे. लातूरमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.
भिवंडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेत अडथळे आहेत. परभणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीवर असली तरी सत्तेची समीकरणे अद्याप जुळलेली नाहीत.
एकूणच राज्यातील महानगरपालिकांच्या निकालांतून महायुती आणि भाजपचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे. आगामी काळात या महापालिकांमधील सत्तास्थापना आणि स्थानिक राजकारणाच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



