मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ९८ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे. या निधीमुळे पात्र महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानाचा हप्ता सुरळीतपणे दिला जाणार आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी ३,९६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील वर्षात राज्यातील सुमारे २.४ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र ई-केवायसी पडताळणी सक्तीची केल्यानंतर काही लाभार्थ्यांची नावे अपात्र ठरली. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचे हप्ते डिसेंबर २०२५ पासून थांबवण्यात आले होते.
आता ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना थकीत रक्कम एकत्रित देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यात प्रलंबित हप्त्यांचे वितरण होऊ शकते, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रे व पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



