तुमसर : काळ पुढे सरकला, आयुष्याच्या वाटा बदलल्या, जबाबदाऱ्या वाढल्या… पण मैत्री मात्र तशीच राहिली! तब्बल ३० वर्षांनंतर जनता कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील कला व वाणिज्य शाखेतील ४५ माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि संपूर्ण परिसर आठवणींच्या भावनांनी भारावून गेला.
महाविद्यालयाच्या आवारात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल आणि हुरहूर दाटली. “अरे तू तसाच दिसतोस!”, “आपण इथेच बसायचो ना!” अशा संवादांनी वातावरणात जुन्या दिवसांची चाहूल लागली. वर्गातील खोड्या, तासांमधील गमतीजमती, परीक्षेपूर्वीची धावपळ, आणि शिक्षकांची शिस्त – सगळं काही पुन्हा जिवंत झालं. आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पंकज बोरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मोहन भोयर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना घडविणारे सेवानिवृत्त प्रा. भास्कर बडवाईक, प्रा. डी. एन. कापगते आणि प्रा. व्ही. एम. कुलरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गुरुजनांसमोर नतमस्तक होताना माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील यशाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शनाला दिले.
सेवानिवृत्त प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना जीवनातील अनुभव कथन करत, “स्वप्नं मोठी ठेवा, पण माणुसकी विसरू नका,” असा मोलाचा संदेश दिला. त्या शब्दांनी वातावरणात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.कार्यक्रमाचे संचालन राहुल भूतांगे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सेलोकर यांनी मांडले, मनोगत अनिल भुसारी यांनी व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन सुनील बारेकर यांनी केले.
प्रीती ठाकरे-रिनायत, हेमराज तलमले, सरिता परसमोडे, राजेश पडोळे, लक्ष्मी पडोळे, अजय मुटकुरे, प्रेमलता मस्के, दुर्गाशंकर मस्के, टेकलाल टेंभरे, योगेश धारगावे, अर्चना निखाडे, अरविंद गराडे, अर्चना नखाते, यशवंत मसकरे, दीपक रोडगे, संजय बारागवने, धनसिंग ढोलेवार,बबलू राहँगडाले, सुरेश वाघमारे, दिनेश नगरकर, जयश्री बुराडे बांते, रविंद्र गौपाले,विजय चावके, परिक्षीत माटे, गजानन पटले, मुकेश जांगळे,विनोद नवदेवे,सीताराम वहिले,यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते.तीस वर्षांनंतरची ही पुनर्भेट केवळ एक कार्यक्रम नव्हती, तर आयुष्याच्या सुवर्णक्षणांची नव्याने उजळणी होती. निरोप घेताना “लवकरच पुन्हा भेटूया” या शब्दांनी मैत्रीचा धागा आणखी घट्ट झाला.



