नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इटलीच्या महिला हॉकी संघाशी सामना करणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून आता पात्रता स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यावर संघाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
गट टप्प्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत तीन सामन्यांत सात गुण मिळवून ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवले. स्कॉटलंडलाही सात गुण मिळाले, मात्र गोलफरक कमी असल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गट टप्प्यात भारताने दोन सामने जिंकले, तर एक सामना बरोबरीत राहिला.
दुसरीकडे ‘अ’ गटात इटलीच्या संघाने एक विजय मिळवला, एक सामना बरोबरीत सोडला आणि एका सामन्यात पराभव पत्करला. त्यामुळे त्यांनी दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता भारत आणि इटली यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघासाठी आघाडीवरील खेळाडू नवनीत कौर हिने आतापर्यंत चार गोल करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेल्सविरुद्ध झालेल्या शेवटच्या गट सामन्यात तिने तीन गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इटलीच्या संघाकडून फेडेरिका कार्टा हिच्यावर संघाच्या अपेक्षा असणार आहेत. तिने आतापर्यंत तीन गोल केले आहेत.
दोन्ही संघांच्या मागील सामन्यांचा विचार करता भारताचा वरचष्मा दिसून येतो. सन २०१२ पासून दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले असून त्यापैकी भारताने पाच सामने जिंकले, इटलीने एक सामना जिंकला, तर एक सामना बरोबरीत राहिला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक स्योएर्ड मारीज्ने यांनी सांगितले की, “विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणे ही संघासाठी मोठी कामगिरी आहे. मात्र आम्ही केवळ पात्रता मिळवण्यापुरते थांबणार नाही. प्रत्येक सामन्यात अधिक चांगली कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. उपांत्य फेरीत इटलीचा संघ मजबूत आहे, त्यामुळे पूर्ण एकाग्रतेने खेळण्याचा आमचा निर्धार आहे.”
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा १५ ते ३० ऑगस्टदरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियम या देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे.



