नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्याचा मोठा फटका भारताला बसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीत आतापर्यंत आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच युनायटेड किंगडमच्या पुढाकाराने ६० हून अधिक देशांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केले. त्यांनी लष्करी कारवाईऐवजी राजनैतिक मार्गाने संवाद साधून तणाव कमी करण्यावर भर देत जागतिक समुदायासमोर भारताची ठाम भूमिका मांडली. तसेच, या संघर्षाचा देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असलेला विपरीत परिणामही त्यांनी अधोरेखित केला.
नौवहन महासंचालनालयाच्या माहितीनुसार, या सागरी मार्गावर अडकलेल्या मालवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये नागरिक गमावणारा भारत हा एकमेव देश असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले.
दरम्यान, आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत परराष्ट्र मंत्रालय सतर्क असून सर्व संबंधित विभाग आणि भारतीय दूतावासांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गरज भासल्यास तातडीने मदत पुरवली जाईल.
सध्या आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय वास्तव्यास आहेत. युद्धस्थिती असली तरी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलली असून, नागरिकांचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



