मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे पारंपरिक भारतीय शैलीत स्वागत केले. भारतीय संस्कृती, कला आणि परस्पर मैत्रीचा उत्सव म्हणून ही खास संध्या आयोजित करण्यात आली होती.
रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर या स्वागत सोहळ्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओच्या सुरुवातीला अंबानी दाम्पत्य क्लिंटन यांचे निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर स्वागत करताना दिसतात. यावेळी नीता अंबानी यांनी ‘अतिथी देवो भव’ या भारतीय परंपरेचा उल्लेख करत त्याचा अर्थ स्पष्ट केला.आपल्यासाठी पाहुणे हे देवासमान असतात.
या प्रसंगी खास थेट सितारवादनाची मैफलही आयोजित करण्यात आली होती. पारंपरिक साड्यांमध्ये सजलेल्या दोन महिला कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल सितारवादनाने वातावरण भारावून गेले. कलाकारांचे कौतुक करताना नीता अंबानी म्हणाल्या, “या कलाकार स्वतः जितक्या सुंदर आहेत, तितकंच त्यांचं वादनही सुंदर आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे.”सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी क्लिंटन यांना निवासस्थानातील विविध भाग दाखवत भारतीय कला आणि वारशाबद्दल माहिती दिली. शेवटच्या दृश्यांमध्ये ईशा अंबानी याही क्लिंटन यांचे स्वागत करताना दिसतात.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या विशेष संध्येला सुरेल सितारवादन, गुलाबी मीनाकारी आणि नाजूक सोजनी भरतकाम अशा भारताच्या समृद्ध कलात्मक परंपरांनी सजवण्यात आले होते.यापूर्वीही अंबानी कुटुंबाने आपल्या निवासस्थानी अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवरांचे स्वागत केले आहे. त्यात Queen Rania यांचाही समावेश असून, त्यांचे स्वागत शास्त्रीय भारतीय नृत्य सादरीकरणाने करण्यात आले होते.



