जयपूर : आई म्हणजे माया, त्याग आणि आधार... पण राजस्थानमधील एका घटनेने या नात्यालाच हादरा दिला आहे. पतीच्या निधनानंतर मुलांसाठी जगणाऱ्या एका विधवा आईच्या हत्येमागे तिच्याच मुलीचा हात असल्याचा आरोप समोर आला असून, सरकारी नोकरी आणि मालमत्तेच्या हव्यासातून हा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत नीरज शर्मा यांचे पती न्यायालयात एलडीसी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नीरज यांना सरकारी नोकरी मिळाली. कुटुंबाचा आधार बनलेली ही नोकरीच पुढे त्यांच्या जीवावर बेतल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय आयुषी हिला आईच्या नावावरील मालमत्ता आणि सरकारी नोकरी स्वतःकडे यावी, अशी इच्छा होती. यासाठी तिने जवळच्या नातेवाईकांसोबत मिळून जवळपास तीन महिने नियोजन केल्याचा आरोप आहे. हत्या अपघातासारखी भासावी यासाठी कथितपणे सात लाख रुपयांची सुपारी देऊन मारेकऱ्यांची मदत घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
3 जुलै रोजी नीरज शर्मा आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंगला सोडून परतत असताना भरधाव एसयूव्हीने त्यांना जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा हिट-अँड-रनचा प्रकार वाटला. मात्र, नीरज यांच्या भावाने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुरावे तपासले. त्यातून संपूर्ण कट उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात आयुषी, तिचा काका, कथित सुपारी किलर आणि त्याचे चार साथीदार यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
आईने आयुष्यभर मुलांसाठी संघर्ष केला... पण त्याच आईच्या जीवावर तिच्याच लेकराने उठल्याचा आरोप समोर आल्याने राजस्थानसह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. पैशाचा आणि सरकारी नोकरीचा मोह माणसाला किती टोकाला नेऊ शकतो, याचे हे अस्वस्थ करणारे उदाहरण मानले जात आहे.



