पुणे: जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना १ मे रोजी उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोलवर सुटका मिळू नये यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला दिले आहेत.
आरोपी अटकेत; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल-
या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर हत्या, बलात्कार तसेच POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीविरुद्ध याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेचे क्रौर्य अंगावर शहारे आणणारे-
आरोपीने बालिकेची दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्य हादरले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
संतप्त नागरिकांचे आंदोलन; SIT स्थापन
घटनेनंतर नसरापूर परिसरातील नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरत निषेध नोंदवला. गावात बंद पाळण्यात आला तसेच विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.
दरम्यान, सोलापूरमध्येही या घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
कायद्यात बदलाची गरज अधोरेखित-
गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना पॅरोलवर सुटका मिळाल्यानंतर पुन्हा गुन्हे घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यात बदल करण्याची गरज अधोरेखित होत आहे. नसरापूर प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सरकारने त्यावर तातडीने पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.



