सातारा: जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा रंगली आहे. कोरेगाव येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालयासह तीन शाखांचे उद्घाटन पार पडले. मात्र या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती आणि त्यांच्या छायाचित्राचा अभाव यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “त्या दिवशी माझे आधीच अनेक कार्यक्रम नियोजित होते. कुटुंबीय आणि मतदारसंघातील तब्बल ६८ कार्यक्रमांमुळे उपस्थित राहणे शक्य झाले नाही.” तसेच, फोटो वगळल्याच्या मुद्द्यावर त्यांनी फारसे महत्त्व न देता “जनतेची कामे महत्त्वाची, फोटो नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सूचक शब्दांत काही स्थानिक कार्यकर्त्यांवरही टीका केली. “ज्यांनी कधीच माझं काम केलं नाही, उलट निवडणुकीत विरोधात काम केलं, त्यांच्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही,” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, राजकीय चर्चांना आणखी हवा देणारी बाब म्हणजे भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा. भाजप नेते जयकुमार गोरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “महेश शिंदे यांची विचारसरणी भाजपसारखीच आहे. त्यांना काही अडचण वाटत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू,” असे विधान केले. तसेच साताऱ्यात त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सर्व घडामोडींमुळे महेश शिंदे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली असून, ते खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



