नागपूर : शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी परिसर शुक्रवारी (१ मे) सकाळी भक्तिभावाने आणि उत्साहात निनादला. ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या घोषांनी वातावरण भारावून गेले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भिक्खु संघ, भिक्खुनी संघ आणि अखिल भारतीय धम्म सेना यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भिक्खु संघाने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केले. यावेळी भदंत ससाई यांनी ‘बुद्धाचा कल्याणाचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शन करत, “जगाला युद्ध नव्हे तर बुद्धाची गरज आहे. बुद्धांचे विचार स्वीकारल्यास समाजाची निश्चित प्रगती होईल,” असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, विलास गजघाटे, आनंद फुलझले, डॉ. दीपा पान्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, इंदोरा बुद्ध विहारातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पांढरे वस्त्र परिधान केलेल्या बौद्ध उपासक-उपासिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. पंचशील ध्वजांनी परिसराचे आकर्षण वाढवले.
भदंत ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या ठिकाणीही उपस्थितांना त्रिशरण व पंचशील देण्यात आले.
या कार्यक्रमात विविध भंते, भिक्खुनी आणि धम्मसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



