मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद उफाळून येत असल्याची चर्चा रंगली आहे. सुरुवातीला या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचं नाव आघाडीतून पुढे केलं जाईल, अशी जोरदार चर्चा होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडूनही ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरावं, असा आग्रह धरला जात असल्याचं समोर आलं होतं. यासाठी काँग्रेस नेत्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन चर्चा केल्याचीही माहिती होती.
मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असतानाच चित्र अचानक बदललं. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दानवे यांच्या नावाची यापूर्वी फारशी चर्चा नसताना थेट उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेसकडूनही आता स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा करत आहेत. काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांची नावं देखील उमेदवारीसाठी चर्चेत होती. अशातच ठाकरे गटाने घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र संयमाची भूमिका घेतली जात असून सर्व घटक पक्ष एकत्र बसून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आता काँग्रेस प्रत्यक्षात उमेदवार देते का, आणि या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढतो का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.



