नागपूर :मानवी तस्करीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) पाचपावली परिसरात निर्णायक धडक देत अवैध देहव्यापार चालवणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला. या कारवाईत महिलांना जबरदस्तीने लैंगिक शोषणासाठी वापरणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ, राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.
सापळ्यादरम्यान अॅक्टिव्हा 6G स्कूटरवर येणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपी तौसिफ नियाज कुरेशी (वय २६) आणि झोया तौसिफ कुरेशी उर्फ मखानी राम मिश्रा, रा. पंचशील नगर, पाचपावली अशी त्यांची ओळख आहे. चौकशीत उप्पलवाडी येथील कोमल नितीन पवार हिच्या मदतीने हा बेकायदेशीर धंदा चालवला जात असल्याचे उघड झाले आहे.
तपासात असे स्पष्ट झाले की, आरोपी महिलांसाठी ठिकाणे निश्चित करून आर्थिक फायद्यासाठी त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलत होते. या कारवाईत दोन महिलांना या जाळ्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी अॅक्टिव्हा 6G स्कूटर (MH-49-BQ-0782), विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन, ४,५०० रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा सुमारे १.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त राहुल मणिकर आणि सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU अधिकारी ललिता तोडसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



