छिंदवाडा : ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप प्रकरणाने पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आणली आहे. विषारी कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या चार वर्षीय हर्षचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल १२८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर १ फेब्रुवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
हर्ष हा मूळचा छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया येथील रहिवासी होता. २६ सप्टेंबर रोजी प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. बैतुल जिल्ह्यातील आमला तहसीलमधील टिकाबरी गावात राहणाऱ्या गोकुळ यादव यांचा तो मुलगा होता. विषारी कफ सिरपचे सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावली. औषधातील घातक घटकांमुळे त्याचे मूत्रपिंड व इतर महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ तो कोमात होता.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. रविवारी रात्री उशिरा त्याने अखेरचा श्वास घेतला. सोमवारी नागपूरमध्ये शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. बैतुलचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. मनोज हुरमाडे यांनी या मृत्यूची अधिकृत माहिती दिली.
हर्षच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशा सोडली नव्हती; पण देवाने वेगळाच निर्णय घेतला,” अशा शब्दांत कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली. टिकाबरी गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दरम्यान, ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. छिंदवाडा जिल्ह्यात याच सिरपचे सेवन केल्यानंतर किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. तपासात सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकोल’ हा विषारी घटक आढळून आल्याने औषध निर्मिती व गुणवत्ता नियंत्रणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पीडित कुटुंबीयांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “औषधांचे काटेकोर परीक्षण झाले असते, तर निरपराध मुलांचे जीव वाचले असते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



