नागपूर : नरखेड तालुक्यातील मालापूर येथे बालविवाहाचा प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा विवाह थांबवला. धार्मिक कार्यक्रमाच्या आडून ८वीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा विवाह ३५ वर्षीय पुरुषासोबत लावण्याची तयारी सुरू होती. मात्र, वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे हा प्रकार उधळला गेला.
बाल संरक्षण कक्षाला माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. या घटनेनंतर नरखेड पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तपासादरम्यान हा विवाह धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली गुपचूप पार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गंभीर गुन्हा टळला असून बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या प्रकारात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कारवाईदरम्यान जिल्हा महिला व बालविकास विभाग, बाल संरक्षण अधिकारी, पोलिस आणि चाइल्डलाइनच्या पथकाने समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी केली.
सध्या मुलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील पुनर्वसनाबाबत निर्णय बाल कल्याण समिती घेणार आहे.



