छत्रपती संभाजीनगर : टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या वक्तव्यामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने ‘जोडे मारा’ आंदोलन करत निषेध नोंदवला.
क्रांती चौक येथे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी कठोर शब्दांत टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. इतिहासाची जाण असती तर असे वक्तव्य झाले नसते,” असे त्यांनी म्हटले.
सपकाळ यांनी एका कार्यक्रमात टिपू सुलतान यांचा उल्लेख करत छत्रपतींशी तुलना केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी काँग्रेसवर टीका करत, “शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर असे वक्तव्य करणे अयोग्य आहे. हे सहन केले जाणार नाही,” असा इशारा दिला. आगामी शिवजयंतीला आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनात महापौर समीर राजूरकर, आमदार संजय केणेकर तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काळात वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



