कोलकाता : पश्चिम बंगालच्या बारुईपूर येथील १२ वर्षीय मुलीवरील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रभास मंडल याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. गुन्ह्याच्या घटनास्थळाची पुनर्रचना सुरू असताना आरोपीने एका पोलिसाचे शस्त्र हिसकावून पथकावर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत आरोपी गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बारुईपूरचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीला घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यावेळी त्याने अचानक पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेत गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत त्याला गोळी लागली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजता तपास पथक आरोपीला घेऊन सूर्यपूर परिसरातील घटनास्थळी पोहोचले होते. गुन्ह्याची पुनर्रचना सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ५ जुलै रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर परिसरातील एका तलावातून १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ४ जुलैच्या सायंकाळपासून मुलगी बेपत्ता होती. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या डिजिटल पुराव्यांवरून हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन ४ जुलै रोजी दुपारी ४.३० ते रात्री ११ वाजेदरम्यान एकाच परिसरात असल्याचे निष्पन्न झाले असून, हीच वेळ गुन्हा घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



