नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने थैमान घातले असून नवापूर तालुका याचा केंद्रबिंदू ठरला आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलत चिकन आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी लागू केली आहे. परिणामी, पोल्ट्री व्यवसायासह संपूर्ण फूड चेनवर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत जवळपास दीड ते पावणे दोन लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून सुमारे ८ लाख अंडीही नष्ट करण्यात आली आहेत. बाधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे काम दिवसरात्र सुरू असून एका दिवसातच ३३ हजार कोंबड्या ठार करण्यात आल्याची नोंद आहे.
नवापूर तालुक्यातील ३८ पैकी २७ पोल्ट्री फार्म सध्या कार्यरत असून त्यामध्ये लाखो पक्षी आहेत. संसर्ग रोखण्यासाठी पोल्ट्रीशी संबंधित खाद्यसाठा, पंख आणि इतर साहित्यही नियमानुसार नष्ट केले जात आहे. संपूर्ण प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने राबवली जात आहे.
या मोहिमेसाठी पशुसंवर्धन विभागाने १०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. नाशिकहूनही तज्ज्ञांची विशेष टीम दाखल झाली असून बाधित परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. निर्जंतुकीकरण, तपासणी, सर्वेक्षण आणि वाहतुकीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एक किलोमीटर परिसरात कत्तल मोहीम सुरू असून १० किलोमीटर परिसरात सखोल सर्वेक्षण चालू आहे.
दरम्यान, अंडी, चिकन आणि संबंधित पदार्थांवरील बंदीमुळे हॉटेल व्यवसाय, चिकन सेंटर आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
विशेष म्हणजे, नवापूर हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पोल्ट्री हब मानला जातो. गेल्या १९ वर्षांत तिसऱ्यांदा येथे बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला आहे.२००६, २०२१ नंतर आता २०२६ मध्ये पुन्हा संसर्ग आढळल्याने उद्योगाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



