नंदुरबार : महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे या संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने पोल्ट्री क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोल्ट्री उत्पादनासाठी ओळख असलेल्या या भागात अचानक वाढलेल्या मृत्यूंमुळे व्यावसायिक हतबल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नवापूरमधील सहा पोल्ट्री फार्ममध्ये संशयास्पदरीत्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. एका फार्ममध्ये १५० ते २०० कोंबड्या मृत आढळल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संबंधित मालकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवले. प्रशासनाने नमुने गोळा करून भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.
या तपासणीत बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संसर्ग रोखण्यासाठी बाधित परिसराच्या एक किलोमीटर परिसरात ‘कलिंग’ मोहीम राबवली जात आहे. यामध्ये संक्रमित कोंबड्यांचा नाश केला जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नवापूरमध्ये यापूर्वीही बर्ड फ्ल्यूचे संकट ओढवले होते. विशेषतः २०१० साली राज्यभर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असले तरी पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तयार माल नष्ट होत असल्याने आणि व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली आहे.



