जालना : समृद्धी महामार्गावर वेगाचे संकट पुन्हा एकदा समोर आले असून जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात अत्यंत भीषण अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या महिला मजुरांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ५ ते ६ जणींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे जाणारा ट्रक वेगात होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो थेट कामात गुंतलेल्या महिलांवर जाऊन आदळला. धडक इतकी तीव्र होती की, महिलांना बचावाची संधीच मिळाली नाही.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे. काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर ती सुरळीत करण्यात आली.
या दुर्दैवी घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



