रेती साठवणुकीसाठी नियम बसविले धाब्यावर
तुमसर : तुमसर तालुक्यातील बामणी येथे रेती घाटाच्या लिलावानंतर आता पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला असून, रेती साठवणुकीसाठी चक्क उभ्या असलेल्या मौल्यवान सागवान वृक्षांचा बळी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा नोंदवून मुद्देमाल जप्त केला असला, तरी रेती माफियांच्या मुजोरीपुढे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
शासनाने बामणी येथील रेती घाटाचा लिलाव केला आहे. घाटातून निघणारी रेती साठवण्यासाठी घाट मालकाने नदीकाठावरील शेतजमीन वार्षिक १ लाख रुपये भाड्याने घेतल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या शेतात असलेली मौल्यवान सागवान झाडे रेती साठवणुकीत अडथळा ठरत होती. ही झाडे परवानगी घेऊन तोडण्याऐवजी, रात्री जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उपटून काढण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने १७ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान गट क्र. ३६९ मध्ये ७ मोठ्या सागवान वृक्षांची अवैध तोड झाल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने या ठिकाणाहून १८ नग सागवान लाकूड जप्त केले असून, शेतमालक श्रीधर जोशी कहालकर यांच्याविरुद्ध 'महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४' नुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह...
मागील ४-५ दिवसांपासून बामणी येथे ६० ते ७० ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक आणि साठवणूक सुरू आहे. झाडे उपटून निसर्गाची हानी केली जात असताना महसूल प्रशासन मूग गिळून गप्प का असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
घटनास्थळाचा पंचनामा करून अवैध सागवान लाकूड जप्त केले आहे. वृक्षतोड अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- छगनलाल रहांगडाले, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.



