नाशिक : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीची मुदत संपत असल्याने क्राईम ब्रांचने ती वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) आणि क्राईम ब्रांचकडून सुरू असून तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. या महिलांची चौकशी गोपनीय पद्धतीने सुरू आहे.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीविरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे असून तपासासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. विशेषतः लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्या वापरातून पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातील काही प्राथमिक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. तसेच आरोपीकडे सापडलेल्या काही मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे फसवणुकीचाही संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आरोपीवर वन्यजीव शिकार प्रकरणाचाही संशय असून हरणाची शिकार करून ‘कस्तुरी’ नावाने पदार्थ दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी भक्तांना साप, वाघ दाखवून चमत्काराचे दावे करत असल्याचाही तपासात उल्लेख आहे. त्याच्याकडून पाच जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचे होत असून पुढील तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



