नागपूर : शहरात जाहीर करण्यात आलेल्या ३६ तासांच्या पाणीपुरवठा बंदीचा मोठा फटका आता शासकीय आरोग्य व्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे. मंगळवार सकाळी १० वाजल्यापासून बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने मेयो रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) येथे दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.
विदर्भासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे या दोन्ही रुग्णालयांवर आधीच प्रचंड ताण आहे. त्यातच पाणीटंचाईची भर पडल्याने स्वच्छता, उपचार व्यवस्था आणि दैनंदिन कामकाज विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मेयो रुग्णालयाकडून पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरची मागणी करण्यात आली असून गरजेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून घेण्याची तयारी ठेवली आहे. तर GMCH प्रशासनाने वारंवार उद्भवणाऱ्या अशा समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून स्वतंत्र पाणीपुरवठा लाईनची मागणी केली आहे.
तप्त उन्हाळ्यात अचानक लागू झालेल्या या पाणीबंदीमुळे पुढील काही तास रुग्णालयांसाठी आव्हानात्मक ठरणार असून, रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे.



